गोंदिया जिल्हा १९९९ मध्ये भंडारा जिल्ह्याच्या विभाजनातून निर्माण झाला. मुळातच भंडारा हा तलावांचा जिल्हा आहे. त्याचबरोबर गोंदियाचेही ‘तलावांचा जिल्हा’ हे वैशिष्ट्य कायम राहिले आहे. प्राचीन, सुप्रसिद्ध नाटककार भवभूतीची ही भूमी! गोंड, हळवी आदी जमातींचा निवास, घनदाट जंगले, समृद्ध खनिज संपत्ती ही गोंदिया जिल्ह्याची मुख्य वैशिष्ट्ये. तसेच गोंदिया तांदूळ उत्पादनात महाराष्ट्रात अग्रेसर आहे. डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य (नवेगाव राष्ट्रीय उद्यान) व नागझिरा अभयारण्य यांसह गोंदिया पर्यटनातही प्रगती करत आहे.