Tuesday, 31 May 2011

दळणवळण

दळणवळण

हाजीरा-धुळे-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्याच्या मध्य भागातून गेला असून, सौदंड, सडक-अजुर्नी, देवरी ही या मार्गावरील महत्त्वाची गावे होत.

मुंबई-कोलकाता लोहमार्ग या जिल्ह्यातून जातो. जबलपूर (मध्य प्रदेश) व चंद्रपूर या शहरांना जोडणारा रेल्वे मार्ग जिल्ह्यातून जातो. एकूण लोहमार्ग १८१.८ कि.मी. असून, गोंदिया हे जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे जंक्शन आहे.
गोंदियाचे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरापासूनचे अंदाजे अंतर 
मुंबई ------------------९९८कि.मी
नागपूर --------------- १४३कि.मी
औरंगाबाद -------------६४१कि.मी
रत्नागिरी ---------------१०७४कि.मी
पुणे ------------------- ८६७कि.मी

संद़र्भ- महाराष्ट्र मार्गदर्शक नकाशा
समर्थ उद्योग, औरंगाबाद.

पर्यटन

जिल्ह्यातील जवळजवळ ५०% क्षेत्र वनाच्छादित असून, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य  यांसाठी गोंदिया पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे.
दिनांक ७ जून, १९७० रोजी अभयारण्याचा दर्जा मिळालेले, सुमारे १५० चौ. कि.मी परिसरात पसरलेले नागझिरा अभयारण्य हे व्याघ‘ दर्शनासाठी, वर्षभरात सरासरी ३०,००० पर्यटकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरते. येथे आपणास सस्तन प्राण्यांच्या ३४ प्रजाती, पक्ष्यांच्या १६६ प्रजाती तर सरपटणार्‍या प्राण्यांच्या ३४ प्रजाती पाहावयास मिळतात. येथील जंगलांत प्रामुख्याने चितळ, सांबर, वाघ, अस्वल, गवा इत्यादी प्राणी व तितर, मोर आदी इत्यादी पक्षी आढळतात.

आपली जैवविविधता जपत, हे अभयारण्य जिल्ह्यातील रहिवाशांसाठी जणू निसर्गाने प्रदान केलेल्या ‘हरित फुफ्फुसांचे’ काम करते. शोभेची झाडे, सुवासिक व औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे असे सुमारे २०० प्रकारचे वृक्ष या अभयारण्यात आढळतात.

पावसाळ्याचे चार महिने (जून-सप्टेंबर) वगळता, नागझिरा अभयारण्य हे पर्यटकांसाठी वर्षभर खुले असून, या ठिकाणी रस्ते (राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील साकोलीपासून २०० कि.मी वर स्थित), रेल्वे (भंडारा रोड, गोंदिया, सौंदड रेल्वे स्टेशन) व  हवाई मार्गाने (नागपूर विमानतळ) पोहोचता येते. पर्यटकांसाठी राहण्याची उत्तम सोय येथील विश्रामगृहांतून होऊ शकते.

पर्यावरणाविषयी जनजागृतीसाठी अभयारण्यामध्ये एक वस्तू संग्रहालय आहे, जेथे अभयारण्यातील वन्यजीवांविषयी माहितीपट दाखविण्यात येतात व काही वन्यजीवांचे अवशेष संग्रहित करून प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. पर्यावरण व मनुष्य वस्ती यांमधील सुसंगती साधत नागझिरा अभयारण्य विदर्भातील एक महत्त्वाचे स्थान ठरले आहे.
जिल्ह्यातील आणखी एक पर्यटन स्थळ म्हणून प्रचलित असणारे स्थान म्हणजे नवेगाव राष्ट्रीय उद्यान. येथील पक्षी अभयारण्याचे डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य असे नामकरण झाले असून, महाराष्ट्रातील ६०% पक्ष्यांच्या प्रजाती आपणास येथेच पाहावयास मिळतात. सुमारे १४० चौ. कि.मी क्षेत्रावर पसरलेले हे राष्ट्रीय उद्यान अर्जुनी - मोरगाव तालुक्यात असून, या रम्य परिसरास वर्षाला सुमारे ५०,००० पर्यटक भेट देतात.
येथे असलेला जंगलाचा भाग हा नागझिरा अभयारण्यापासून सुरू होऊन  गडचिरोली जिल्ह्यातून थेट छत्तीसगढपर्यंत जातो. असे म्हटले जाते की, हा जंगलप्रदेश हत्तींचा येण्या - जाण्याचा मार्ग होता व म्हणूनच नागझिरा अभारण्यातील हत्तीखोदरा  व नवेगाव अभयारण्यीतल हत्तीपंगडी  या ठिकाणांना तशा प्रकारची  नावे मिळाली.
नवेगाव बांध हा तलाव सुमारे ११ वर्ग कि.मी परिसरात पसरलेला असून, त्याच्या निर्मितीबद्दलचा इतिहास जाणून घेणे रोचक ठरेल.
गोंड राजा दलपतशहा याची राणी दुर्गावती हिने इ.स. १३०० मध्ये कोहाली जमातीच्या कोल्हू व चिमणा पाटील यांच्यावर हा तलाव बांधण्याची जबाबदारी सोपवली. कोहाली जमात ही पुरातन काळापासून खोदाईचे काम व दगडी बांधकामात विशेष नैपुण्य असणारी अशी समजली जाते. आपल्या राज्यातील शेतीच्या विकासासाठी लागणार्‍या पाणीसाठ्याचा दूरदृष्टीने विचार करून राजा दलपतशहा याने  कोहाली जमातीस अनेक तलाव, बंधारे व हौद बांधण्याचे काम दिले. या कामात १२ गावांतील प्रस्थापितांना एका ठिकाणी वसविण्यात आले व त्याच गावाचे नाव नवेगाव असे पडले.

कोल्हू व चिमणा पाटील यांची ११वी पिढी ही नवेगाव बांधपासून १० कि.मी असणार्‍या धाबे-पावनी येथे राहत असून, त्यांच्याकडून ह्या बाबतची माहिती मिळते.

नवेगाव अभयारण्य हे रस्ते, रेल्वे व हवाई मार्गाने (नागपूर विमानतळ) जोडले असून येथे पर्यटकांची राहण्याची उत्तम सोय होऊ शकते.
तलावांनी संपन्न असलेल्या या जिल्ह्यात ‘नवेगाव बांध’ हा सर्वात मोठा तलाव आहे. सात टेकड्यांनी हा वेढला गेला आहे. या टेकड्यांना ‘सेव्हन सिस्टर्स’ म्हटले जाते. या तलावाच्या मध्यभागी ‘मालडोंगरी’ नावाचे बेट आहे.तिरोडा तालुक्यातील बोदलकसा हा तलाव इंग्रजी ‘G’ आकाराचा आहे. हे तलावदेखील पर्यटन स्थळेच आहेत.

गोंदिया जिल्ह्यात काही मोजकीच पण उल्लेखनीय अशी धार्मिक स्थळे आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील प्राचीन शिवमंदिर व सालेकसा येथील गढमातेचे मंदिर प्रसिद्ध आहे. सालेकसा येथील २५,००० वर्षांपूर्वीची गुफा (काचरगड) आहे. तेथे पाषाणयुगातील काही हत्यारे सापडली आहेत. सालेकसा येथील हजरा धबधबा पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.
जिल्ह्यात कामथा येथील शिवमंदिर व तिरोरा तालुक्यातील दक्राम सुकडी येथील श्री चक्रधर स्वामींचे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

Monday, 23 May 2011

सामाजिक / विविध

देवरी, सालेकसा, आमगाव, अर्जुनी-मोरगाव या तालुक्यांतील डोंगराळ भागात व दाट जंगलांच्या प्रदेशात गोंड, गोवारी, हळबी यांसारख्या आदिवासी जमाती राहतात.  गोंड ही भारतातील संख्येने सर्वांत मोठी असलेली आदिवासी जमात आहे. हे लोक गोंडी बोलीभाषा बोलतात. गोंडी बोली तमीळ व कन्नडशी मिळतीजुळती आहे. गोंडांच्या एकूण चाळीस उपजमाती आहेत, त्यापैकी पंधरा महाराष्ट्रात आहेत. यांमध्ये राजगोंड, माडिया, गैता,धुरवा इत्यादींचा उल्लेख करता येईल.

या जमातींच्या काही वेगळ्या चालीरिती व रूढी असून, ‘पेरसा पेन’ हा त्यांचा मुख्य देव आहे. पिकांची कापणी झाल्यावर व काही सणासमारंभाला हे आदिवासी लोक, ‘रेला’ किंवा ‘ढोल’ नावाचे नृत्य करून आपला आनंद साजरा करतात. होळी, दसरा व दिवाळी हे त्यांचे प्रमुख सण होत.

शैक्षणिकदृष्ट्या गोंदिया जिल्हा हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत येतो. या विद्यापीठाच्या अंतर्गत या जिल्ह्यात एकूण २९ विविध प्रकारची महाविद्यालये आहेत.

विशेष व्यक्ती

प्राचीन भारतातील कालिदासाइतकेच श्रेष्ठ साहित्यिक व प्रतिभावान नाटककार भवभूति यांचे जन्मस्थान हे या जिल्ह्यातील पद्मपूर हे होय. ‘उत्तर रामचरित’ , ‘मालतीमाधव’ आदी नाट्यकृती भवभूति यांनी लिहिल्या  आहेत. भवभूती हे कवि कालिदासांच्या नंतर ४०० वर्षांनी होऊन गेल्याचे समजते व त्यांचा काल हा ८व्या शतकातील असावा असे म्हटले जाते. जिल्ह्यात आमगावजवळ त्यांचे स्मारक आहे.