Saturday, 6 August 2011

भूगोल

भौगोलिक दृष्ट्या हा जिल्हा महाराष्ट्राला मध्य प्रदेश (बालाघाट जिल्हा) व छत्तीसगड (राजनंदनगाव जिल्हा) या राज्यांना जोडतो. गोंदिया जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश व पूर्वेस छत्तीसगड राज्याचा प्रदेश आहे. तसेच जिल्ह्याच्या दक्षिणेस गडचिरोली व पश्चिमेस भंडारा हे आहेत.
प्रमुख नदी ही वैनगंगा असून ती जिल्ह्याच्या उत्तर सीमाप्रदेशातून वाहते. बाघ ही तिची प्रमुख उपनदी असून, ईशान्य सीमाभागातून वाहते. याशिवाय बावनथडी, पांगोली, चुलबंद व गाढवी या वैनगंगेच्या उपनद्या जिल्ह्यातून वाहतात.

डोंगराळ प्रदेश, विषम हवामान, विविध प्रकारची जमीन (माती), अनेक नद्यांनी व जैवविविधतेने समृद्ध असणारा हा गोंदिया जिल्हा आपणास निसर्गाची अनेक रूपे दाखवितो. जिल्ह्यात नवेगाव बांध हा जिल्ह्यातील तलावांपैकी सर्वाधिक मोठा तलाव आहे. या तलावासह माजागड, रेंगोपार, चूलबंद, उमरझरी, रिसपार, बोदलकसा, संग्रामपूर, खळबंदा, चोरखमारा इत्यादी छोटे-मोठे तलाव जिल्ह्याच्या सौंदर्यात भर घालतात, तसेच जलसिंचनाचेही कार्य साधतात. अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील, गाढवी नदीवरील इटियाडोह प्रकल्प हा जिल्ह्यातील सर्वाधिक महत्त्वाचा प्रकल्प (धरण) आहे. याची क्षमता सुमारे ३१८ क्यु. मी. आहे. जिल्ह्यात शिरपूर, पुजारीटोला, कालिसराड ही धरणे आहेत. याशिवाय मानगढ, संग्रामपूर, बोदलकसा इत्यादी ठिकाणी छोटी धरणे आहेत.

खनिज संपत्तिच्या दृष्टिकोनातून गोंदिया जिल्हा समृद्ध समजला जातो. येथे ग्रेनाईट, मँगनीज, लोह खनिज, क्रोमाईट, कायनाईट, क्वार्टझाईट, सिझियम, व्हॅनेडियम ही खनिजे सापडतात.


लोकसंख्या : संदर्भ - जनगणना २००१
लोकसंख्येच्या तपशिलावरून हा जिल्हा कमी नागरीकरण झाल्याचे दिसते. ग्रामीण जिल्हा’ (म्हणजे मागासलेला नव्हे) हेच याचे वैशिष्ट्य आहे. तसेच दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचे जास्त असलेले प्रमाण हीदेखील एक लक्षणीय बाब आहे.

प्रशासन

                                        गोंदिया जिल्ह्यातील एकूण ८ तालुके पुढीलप्रमाणे:
 
 क्र.  तालुका  क्षेत्रफळ (चौ. कि. मी.) लोकसंख्या
                             1       गोंदिया                    ६८६.१                                  ३,७१,७४६
                             2       तिरोडा                     ४९६.६                                 १,६५,५१६
                             3       गोरेगाव                   ४७९.०                                 १,१६,६८५
                             4       आमगाव                  ३५४.०                                १,२२,५०४
                             5        देवरी                      १,००२.०                               १,०२,०९३
                             6       सालेकसा                ४४३.०                                  ७७,६९०
                             7       सडक-अर्जुनी          ६०६.०                                   १,०७,४९३
                             8       अर्जुनी- मोरगाव     ६६६.०                                   १,३६,९८०


जिल्ह्यातील क्षेत्रफळानुसार देवरी तालुका सगळ्यात मोठा (१,००२ चौ. कि.मि) असून, लोकसंख्येत गोंदिया तालुका सर्वात मोठा (३,७१,७४६) आहे.
                                          नागरी प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था
क्र. प्रशासनाचा प्रकार संख्या  नावे

                            1      नगरपालिका            ०२   गोंदिया,तिरोडा
                            2     पंचायत समित्या       ०८  गोंदिया,तिरोडा,गोरेगाव,देवरी,आमगाव,
                                                                          सालेकसा, सडक-अर्जुनी, अर्जुनी- मोरगाव

                 जिल्ह्यातील लोकवस्ती असलेल्या  एकूण ८९३ गावांपैकी ५५४ ग्रामपंचायती आहेत.


Tuesday, 26 July 2011

ऐतिहासिक महत्त्वाचे

प्राचीन काळात भवभूती हा कालिदासाच्या तोडीचा नाटककार या जिल्ह्यात होऊन गेल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.
ज्या भंडारा जिल्ह्यातून गोंदिया निर्माण करण्यात आला, त्या भंडारा जिल्ह्याचा उल्लेख रतनपूर (जि. बिलासपूर) येथील शिलालेखात सापडले आहेत. भंडारा हा जिल्हा अधिकृतरीत्या १८२१ मध्ये अस्तित्वात आला. गोंदिया हा तेव्हापासून या जिल्ह्याचा भाग होता. १८८८ मध्ये भंडार्‍याचे विभाजन होऊन नवा गोंदिया जिल्हा निर्माण झाला.
महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी आत्ताच्या गोंदिया (पूर्वीचा भंडारा ) जिल्ह्यातील काही भागांत प्रवास व वास्तव्य केले   होते.

राजकीय संरचना

लोकसभा मतदारसंघ  - गोंदिया जिल्ह्यातील  अर्जुनी- मोरगांव, तिरोडा, गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा, साकोली हे विधानसभा मतदारसंघ मिळून गोंदिया - भंडारा लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. जिल्ह्यातील आमगांव विधानसभा मतदारसंघ गडचिरोली-चिमूर ह्या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट केला आहे.
विधानसभा मतदारसंघ  -जिल्ह्यात ४(अर्जुनी- मोरगांव, तिरोडा, गोंदिया व आमगांव) विधानसभा मतदारसंघ आहेत.
गोंदिया जिल्हा परिषदेचे५२ मतदारसंघ असून, पंचायत समितीचे एकूण १०४ मतदारसंघ आहेत.

Thursday, 23 June 2011

शेती

गोंदिया जिल्हा हा तांदूळ उत्पादनात महाराष्ट्रात अग्रेसर आहे व येथील धान (भात) गिरण्यांसाठीदेखील प्रसिद्ध आहे. गोंदिया शहर म्हणूनच ‘तांदूळाचे शहर’ असे ओळखले जाते. सुवर्णा, जया इत्यादी जातींचा तांदूळ जिल्ह्यातून मध्यपूर्वेतील देशांना निर्यातही केला जातो. हा जिल्हा अर्थातच शेतीप्रधान आहे. जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ७० ते ७५% लोकसं‘या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे व जलसिंचनाच्या सोयीही आहेत. त्यामुळेच भाताचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. भातासह तूर व उडीद ही पीके खरीप हंगामात घेतली जातात. रब्बी हंगामात गहू, ज्वारी, जवस व हरभरा ही पिके प्रामुख्याने जिल्ह्यात घेतली जातात.

जिल्ह्यातील तलावांची संख्या जास्त असल्याने येथे मत्स्यशेती उत्तम चालते. इटियाडोह (तालुका-अर्जुनी मोरगाव) व आंभोरा (तालुका - गोंदिया) येथे मत्स्यबीज प्रजनन केंद्रे कार्य करतात. तसेच जिल्ह्यात काही प्रमाणात ऊसही घेतला जातो. वैनगंगा सहकारी साखर कारखाना तिरोडा तालुक्यात माडगी येथे आहे.

उद्योग

मुबलक प्रमाणात जलसंपदा असल्याने गोंदिया जिल्हा कृषिप्रधान तर आहेच, शिवाय येथे कृषिप्रधान लघु उद्योग मोठ्या प्रमाणात चालतात. जिल्ह्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वनांनी व्याप्त केलेले असल्याने ‘वनोत्पादने’ हा येथील प्रमुख घटक आहे. वनांतून तेंदूची पाने गोळा करणे व त्यांचा वापर विड्या वळण्याच्या उद्योगात करणे - हे प्रमुख उद्योग जिल्ह्यात चालतात.

या शिवाय  जिल्ह्यात गोड्या पाण्यातील (तलावांतील) मासेमारी, जंगलांतून डिंक व लाख जमा करणे,बांबूच्या विविध वस्तू बनविणे, मातीच्या विटा, कौले व भांडी तसेच प्राण्यांच्या शिंगापासून वस्तू बनविण्याचे व्यवसाय केले जातात.

गोंदिया व तिरोडा येथे औद्योगीक वसाहती स्थापन झाल्या आहेत. पुढील कोष्टकात जिल्ह्यातील काही प्रमुख उद्योग व त्यांचे ठिकाण नमूद करीत आहोत.

क्र.  उद्योग/व्यवसाय   ठिकाण
                             1      मँगनीज शुद्धीकरण                   माडगी (तालुका तिरोडा)
                             2      तेल गिरणी                               खमारी (तालुका गोंदिया)
                             3     धान (तांदूळ) गिरण्या            गोंदिया,  तिरोडा, गोरेगाव, आमगाव,
                                                                              मुंडिकोटा
                             4     लाकूड कटाई                         गोंदिया,  तिरोडा, नवेगाव बांध, आमगाव,
                                                                             मुंडिकोटा
                            5     कागद कारखाना                    चंगेरा (तालुका गोंदिया)
                            6     टाइल्स                                   रजेगाव (तालुका गोंदिया)
                            7    विड्या वळणे                         गोंदिया,  तिरोडा, देवरी,आमगाव,
                                                                             सालेकसा

Tuesday, 31 May 2011

दळणवळण

दळणवळण

हाजीरा-धुळे-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्याच्या मध्य भागातून गेला असून, सौदंड, सडक-अजुर्नी, देवरी ही या मार्गावरील महत्त्वाची गावे होत.

मुंबई-कोलकाता लोहमार्ग या जिल्ह्यातून जातो. जबलपूर (मध्य प्रदेश) व चंद्रपूर या शहरांना जोडणारा रेल्वे मार्ग जिल्ह्यातून जातो. एकूण लोहमार्ग १८१.८ कि.मी. असून, गोंदिया हे जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे जंक्शन आहे.
गोंदियाचे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरापासूनचे अंदाजे अंतर 
मुंबई ------------------९९८कि.मी
नागपूर --------------- १४३कि.मी
औरंगाबाद -------------६४१कि.मी
रत्नागिरी ---------------१०७४कि.मी
पुणे ------------------- ८६७कि.मी

संद़र्भ- महाराष्ट्र मार्गदर्शक नकाशा
समर्थ उद्योग, औरंगाबाद.

पर्यटन

जिल्ह्यातील जवळजवळ ५०% क्षेत्र वनाच्छादित असून, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य  यांसाठी गोंदिया पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे.
दिनांक ७ जून, १९७० रोजी अभयारण्याचा दर्जा मिळालेले, सुमारे १५० चौ. कि.मी परिसरात पसरलेले नागझिरा अभयारण्य हे व्याघ‘ दर्शनासाठी, वर्षभरात सरासरी ३०,००० पर्यटकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरते. येथे आपणास सस्तन प्राण्यांच्या ३४ प्रजाती, पक्ष्यांच्या १६६ प्रजाती तर सरपटणार्‍या प्राण्यांच्या ३४ प्रजाती पाहावयास मिळतात. येथील जंगलांत प्रामुख्याने चितळ, सांबर, वाघ, अस्वल, गवा इत्यादी प्राणी व तितर, मोर आदी इत्यादी पक्षी आढळतात.

आपली जैवविविधता जपत, हे अभयारण्य जिल्ह्यातील रहिवाशांसाठी जणू निसर्गाने प्रदान केलेल्या ‘हरित फुफ्फुसांचे’ काम करते. शोभेची झाडे, सुवासिक व औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे असे सुमारे २०० प्रकारचे वृक्ष या अभयारण्यात आढळतात.

पावसाळ्याचे चार महिने (जून-सप्टेंबर) वगळता, नागझिरा अभयारण्य हे पर्यटकांसाठी वर्षभर खुले असून, या ठिकाणी रस्ते (राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील साकोलीपासून २०० कि.मी वर स्थित), रेल्वे (भंडारा रोड, गोंदिया, सौंदड रेल्वे स्टेशन) व  हवाई मार्गाने (नागपूर विमानतळ) पोहोचता येते. पर्यटकांसाठी राहण्याची उत्तम सोय येथील विश्रामगृहांतून होऊ शकते.

पर्यावरणाविषयी जनजागृतीसाठी अभयारण्यामध्ये एक वस्तू संग्रहालय आहे, जेथे अभयारण्यातील वन्यजीवांविषयी माहितीपट दाखविण्यात येतात व काही वन्यजीवांचे अवशेष संग्रहित करून प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. पर्यावरण व मनुष्य वस्ती यांमधील सुसंगती साधत नागझिरा अभयारण्य विदर्भातील एक महत्त्वाचे स्थान ठरले आहे.
जिल्ह्यातील आणखी एक पर्यटन स्थळ म्हणून प्रचलित असणारे स्थान म्हणजे नवेगाव राष्ट्रीय उद्यान. येथील पक्षी अभयारण्याचे डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य असे नामकरण झाले असून, महाराष्ट्रातील ६०% पक्ष्यांच्या प्रजाती आपणास येथेच पाहावयास मिळतात. सुमारे १४० चौ. कि.मी क्षेत्रावर पसरलेले हे राष्ट्रीय उद्यान अर्जुनी - मोरगाव तालुक्यात असून, या रम्य परिसरास वर्षाला सुमारे ५०,००० पर्यटक भेट देतात.
येथे असलेला जंगलाचा भाग हा नागझिरा अभयारण्यापासून सुरू होऊन  गडचिरोली जिल्ह्यातून थेट छत्तीसगढपर्यंत जातो. असे म्हटले जाते की, हा जंगलप्रदेश हत्तींचा येण्या - जाण्याचा मार्ग होता व म्हणूनच नागझिरा अभारण्यातील हत्तीखोदरा  व नवेगाव अभयारण्यीतल हत्तीपंगडी  या ठिकाणांना तशा प्रकारची  नावे मिळाली.
नवेगाव बांध हा तलाव सुमारे ११ वर्ग कि.मी परिसरात पसरलेला असून, त्याच्या निर्मितीबद्दलचा इतिहास जाणून घेणे रोचक ठरेल.
गोंड राजा दलपतशहा याची राणी दुर्गावती हिने इ.स. १३०० मध्ये कोहाली जमातीच्या कोल्हू व चिमणा पाटील यांच्यावर हा तलाव बांधण्याची जबाबदारी सोपवली. कोहाली जमात ही पुरातन काळापासून खोदाईचे काम व दगडी बांधकामात विशेष नैपुण्य असणारी अशी समजली जाते. आपल्या राज्यातील शेतीच्या विकासासाठी लागणार्‍या पाणीसाठ्याचा दूरदृष्टीने विचार करून राजा दलपतशहा याने  कोहाली जमातीस अनेक तलाव, बंधारे व हौद बांधण्याचे काम दिले. या कामात १२ गावांतील प्रस्थापितांना एका ठिकाणी वसविण्यात आले व त्याच गावाचे नाव नवेगाव असे पडले.

कोल्हू व चिमणा पाटील यांची ११वी पिढी ही नवेगाव बांधपासून १० कि.मी असणार्‍या धाबे-पावनी येथे राहत असून, त्यांच्याकडून ह्या बाबतची माहिती मिळते.

नवेगाव अभयारण्य हे रस्ते, रेल्वे व हवाई मार्गाने (नागपूर विमानतळ) जोडले असून येथे पर्यटकांची राहण्याची उत्तम सोय होऊ शकते.
तलावांनी संपन्न असलेल्या या जिल्ह्यात ‘नवेगाव बांध’ हा सर्वात मोठा तलाव आहे. सात टेकड्यांनी हा वेढला गेला आहे. या टेकड्यांना ‘सेव्हन सिस्टर्स’ म्हटले जाते. या तलावाच्या मध्यभागी ‘मालडोंगरी’ नावाचे बेट आहे.तिरोडा तालुक्यातील बोदलकसा हा तलाव इंग्रजी ‘G’ आकाराचा आहे. हे तलावदेखील पर्यटन स्थळेच आहेत.

गोंदिया जिल्ह्यात काही मोजकीच पण उल्लेखनीय अशी धार्मिक स्थळे आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील प्राचीन शिवमंदिर व सालेकसा येथील गढमातेचे मंदिर प्रसिद्ध आहे. सालेकसा येथील २५,००० वर्षांपूर्वीची गुफा (काचरगड) आहे. तेथे पाषाणयुगातील काही हत्यारे सापडली आहेत. सालेकसा येथील हजरा धबधबा पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.
जिल्ह्यात कामथा येथील शिवमंदिर व तिरोरा तालुक्यातील दक्राम सुकडी येथील श्री चक्रधर स्वामींचे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

Monday, 23 May 2011

सामाजिक / विविध

देवरी, सालेकसा, आमगाव, अर्जुनी-मोरगाव या तालुक्यांतील डोंगराळ भागात व दाट जंगलांच्या प्रदेशात गोंड, गोवारी, हळबी यांसारख्या आदिवासी जमाती राहतात.  गोंड ही भारतातील संख्येने सर्वांत मोठी असलेली आदिवासी जमात आहे. हे लोक गोंडी बोलीभाषा बोलतात. गोंडी बोली तमीळ व कन्नडशी मिळतीजुळती आहे. गोंडांच्या एकूण चाळीस उपजमाती आहेत, त्यापैकी पंधरा महाराष्ट्रात आहेत. यांमध्ये राजगोंड, माडिया, गैता,धुरवा इत्यादींचा उल्लेख करता येईल.

या जमातींच्या काही वेगळ्या चालीरिती व रूढी असून, ‘पेरसा पेन’ हा त्यांचा मुख्य देव आहे. पिकांची कापणी झाल्यावर व काही सणासमारंभाला हे आदिवासी लोक, ‘रेला’ किंवा ‘ढोल’ नावाचे नृत्य करून आपला आनंद साजरा करतात. होळी, दसरा व दिवाळी हे त्यांचे प्रमुख सण होत.

शैक्षणिकदृष्ट्या गोंदिया जिल्हा हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत येतो. या विद्यापीठाच्या अंतर्गत या जिल्ह्यात एकूण २९ विविध प्रकारची महाविद्यालये आहेत.

विशेष व्यक्ती

प्राचीन भारतातील कालिदासाइतकेच श्रेष्ठ साहित्यिक व प्रतिभावान नाटककार भवभूति यांचे जन्मस्थान हे या जिल्ह्यातील पद्मपूर हे होय. ‘उत्तर रामचरित’ , ‘मालतीमाधव’ आदी नाट्यकृती भवभूति यांनी लिहिल्या  आहेत. भवभूती हे कवि कालिदासांच्या नंतर ४०० वर्षांनी होऊन गेल्याचे समजते व त्यांचा काल हा ८व्या शतकातील असावा असे म्हटले जाते. जिल्ह्यात आमगावजवळ त्यांचे स्मारक आहे.

Monday, 18 April 2011

महाराष्ट्र नवनिर्माण सेना,गोंदिया

महाराष्ट्र नवनिर्माण सेना,गोंदिया (पूर्व महाराष्ट्र) ........आपले स्वागत करीत आहे.........जय महाराष्ट्र!